रत्नागिरी :
शहरातील साळवी स्टॉप येथील वृत्तपत्र विके्रते लतीफ इब्राहीम अल्वी यांचे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. नाना या नावाने ते सर्वांच्या परिचयाचे होते.
शहरातील मिरजोळे एमआयडीसी येथे राहणारे लतीफ इब्राहीम अल्वी हे दिव्यांग असूनही गेली 25 वर्ष वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत होते. नुसतेच स्टॉलवर न बसता पहाटे साडेचार वाजल्यापासून ते शहरातील स्टेट बँक कॉलनी, एमआयडीसी, टिआरपी, रेल्वे कॉलनी ते रेल्वेस्टेशन या दरम्यानच्या भागामध्ये फिरुन पेपर ही घरोघरी टाकत असत. शुक्रवारी पहाटे 3.45च्या सुमारास पेपर टाकण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. पेपर लाईन टाकत असतानाच साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास जे. के. फाईल केशवनगर भागात पेपर टाकत असतानाच ते मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडणार्या नागरिकांना रस्त्यावर पडलेले दिसून आले.
त्यांना या भागातील नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. दिव्यांग असूनही गेली अनेक वर्ष त्यांना वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय केला. यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला.











