ना. उदय सामंत यांच्याकडे पुन्हा उद्योग खात्याची जबाबदारी

 

ना. योगेश कदम महसुलसह पाच खात्यांचे राज्यमंत्री

रत्नागिरी : प्रतिनिधी
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रात्री नऊ वाजता राज्याच्या मंत्रिमंडळाचा खाते वाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग खाते देण्यात आले आहे तर दापोलीचे आमदार योगेश कदम यांना गृहराज्य शहर, महसूल सह पाच खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले आहे.

विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून आणि घवघवीत यश मिळाले. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विराजमान झाले. त्यानंतर बराच कालावधीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा पूर्ण झाला. मात्र त्यातही खाते वाटप जाहीर करण्यात आलं नाही.

त्यालाही तब्बल एक आठवडा उलटला. एक आठवड्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडलं आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज शनिवारी रात्री नऊ वाजता राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीचे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच मराठी भाषा हे खाते सुध्दा सामंत पाहणार आहेत.

तर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे दुसऱ्यांना निवडून आले त्यांची नियुक्ती राज्यमंत्री पदावर करण्यात आली असून त्यांच्याकडे गृहराज्य ( शहरे), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून ते काम पाहणार आहेत.