हत्ती हटाव मोहीम राबविण्याची शेतकऱ्यांची मागणी
दोडामार्ग । प्रतिनिधी :
हेवाळे परिसरातील गावांत हत्तीचा हैदोस सुरूच असून रविवारी रात्री येथील शेतकरी सूर्याजी देसाई यांच्या मालकीच्या शेकडो नारळ झाडांसह बागायातीची हत्तीने नुकसानी केली. याबाबत वन विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी तसेच हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री हेवाळे,खराडी , घाटीवडे, बांबर्डे भागात हत्तीने केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हत्तीबाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत वनविभागाच्या अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांना हत्तींबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यावेळी अन्य उपाययोजना न करता हत्ती हटाव मोहीम राबवण्यात यावी अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. यावेळी हत्ती बाधितांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती. मात्र, ठोस आश्वासन ग्रामस्थांना मिळाले नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दोन दिवसांत टस्कर हत्तीकडून झालेल्या नुकसाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सहायक वनसंरक्षक सावंतवाडी वैभव बोराटे यांना यांना हत्तीबाधित शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. थेट घरापर्यंत आक्रमण करणाऱ्या टस्कराचा तात्काळ बंदोबस्त करा, हाकारीची संख्या वाढवा, रात्रीप्रमाणे दिवसाही गस्ती ठेवावी, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याला उत्तर देताना श्री. बोराटे यांनी संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगितले.तसेच घाटीवडे भागात बसविण्यात आलेल्या सोलार फॅनसिंग प्रमाणे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक तिथे बसविण्यात येईल. हत्तीकडून झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, यावर हत्तींबाधितांचे समाधान झाले नाही यावेळी श्री. बोराटे यांच्यासमवेत सावंतवाडी वनक्षेत्रपाल संदीप पाटील, वनपाल किशोर जंगले, अजित कोळेकर, मयुरेश करंगुटकर, सुशांत कांबळे तसेच हत्तींबाधित शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, काल पुन्हा मध्यरात्री हेवाळे खराडी भागात शेती बागायतीची मोठी हानी केली. त्याच बरोबर शेती बागायतीची नुकसानी करत असताना शनिवारी रात्री हेवाळे येथील एका शेतकऱ्याचा नारळाचे झाड उन्मळून गुरांच्या गोठ्यावर पडला. या गोठयात एकूण आठ गुरे बांधली गेली होती. यातील सर्व गुरे गंभीरपणे जखमी झाली आहेत. तर यातील एक बैल गोठ्यातून बाहेर गेला तो आज पर्यंत गोठयात आला नव्हता. यासह ,माड,केळी, सुपारी यांची केलेली नासधूस यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवसापूर्वी पहाटे त्या टस्कर हत्तीने थेट राहत्या घरासमोर उभ्या असलेल्या नव्या कोऱ्या कारवर हल्ला करून कारचे मोठे नुकसान केले आहे. या सर्व प्रकाराने हत्ती बाधीत भागात गस्त घालण्यासाठी कर्मचारी तैनात ठेऊन शेतकरी वर्गातून हत्ती मुळे जीवन जगणे मुश्कील झाले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.











