चिपळुणात चौघांच्या हल्ल्यात वृध्द जखमी

 

 

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते मोहल्ला वाशिष्ठी नदीच्या पूलावर खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार यांच्यावर चौघांनी हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. मारहाणीचे कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आबू पवारसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ही घटना शनिवार (ता. २१) सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता मारुती पवार (६३, रा. खेर्डी माळेवाडी, ता.चिपळूण) यांनी दिलेल्या फियर्यादनुसार पवार हे त्यांच्या पांढऱ्या रंगाची चार चाकी घेऊन मंबई- गोवा महामार्गाने मंबईकडून येणारा मित्र स्वप्निल खैर याची वाट पाहात होते. पवार यांच्या पाठीमागून चार चाकी गाडीतून आलेले संशयित रणदीप उर्फ आबू शिवाजी पवार, शुभम शिवाजी पवार, विराज शिंदे, सुरज उर्फ पिंट्या साळुंखे या चौघांनी पवार यांना गाडीतून बाहेर ओढले त्याच वेळी आबू पवार याने लाकडी दस्ताने मारहाण करुन पवार याना जखमी केले व इतर सर्वांनी त्यांना हाताबुक्याने मारहाण केली. जखमी पवार यांना उपचारासाठी प्रथम चिपळूण मधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते परंतु गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रविवारी दुपारी मिरज येथे हलविण्यात आले आहे.