लांजा (प्रतिनिधी): कर्मचारी एकजुटीचा विजय असो, जुनी पेन्शन झालीच पाहिजे , एक मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत तालुक्यातील आरोग्य, बांधकाम, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आज लांजा तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. निमित्त होते ते आपल्या विविध मागण्यांसाठी छेडलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाचे.
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी,
दहा वर्षांपासून सतत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग रत्नागिरी, जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना रत्नागिरी, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे लांजा तालुक्यातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
दिनांक २१ एप्रिल पासून या राज्यव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आणि संघटनेच्या वरिष्ठ स्तरावरून जोपर्यंत आम्हाला सूचना मिळत नाही तोपर्यंत हा राज्यव्यापी बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान या संपाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी लांजा तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत विविध घोषणा दिल्या. कर्मचारी एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाही, एकच मिशन जुनी पेन्शन आधी विविध घोषणा दिल्या.
Home महत्वाच्या बातम्या आपल्या विविध मागण्यांसाठी आरोग्य, बांधकाम, महसूल विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर












