नगरसेविका निलम नाईक यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर गॅस कंपनीला आली जाग

नागरिकांशी साधला संवाद : केवळ अधिकृत ॲप किंवा बँकेतच बिले भरण्याचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :शहरातील सर्वोदय नगर भागात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या (MNGL) नावाने झालेल्या फ्रॉड कॉलमुळे एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाली. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आणि नगरसेविका निलम नाईक यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर कंपनी प्रशासनाला खडेबोल सुनावल्यानंतर अखेर गॅस कंपनीला जाग आली आहे. कंपनीच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) अधिकाऱ्यांनी सर्वोदय नगर येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि सुरक्षिततेबाबत माहिती दिली.

गॅस कंपनीकडून बिल अदा करण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याचा फायदा घेत सायबर भामट्यांनी सर्वोदय नगरमधील एका महिलेला गंडा घातला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत नगरसेविका निलम नाईक यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. या दबावानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट नागरिकांच्या भेटीला धाव घेतली.

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आपत्कालीन स्थिती, तक्रारी आणि मीटर रीडिंगसाठी कंपनीचे केवळ तीन अधिकृत क्रमांक आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही क्रमांकावरून आलेला फोन किंवा मेसेज हा ‘फ्रॉड’ समजावा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

कंपनीने स्पष्ट केले की, ग्राहकांनी गॅस बिल भरण्यासाठी केवळ ‘MNGL’ अधिकृत ॲपचा वापर करावा किंवा ॲक्सिस बँकेत चेकद्वारे बिल जमा करावे. इतर कोणत्याही माध्यमातून पैशांची मागणी केल्यास ती फसवणूक असू शकते. अशा प्रकारच्या फ्रॉड कॉल्सबाबत कंपनीने तक्रार दाखल केली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला नगरसेविका निलम नाईक, सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांच्यासह सर्वोदय नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर कंपनीने आपली बाजू मांडत ग्राहकांना सतर्क केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.