सिंधूरत्नच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात महोत्सव होणार : आ. दीपक केसरकर

आम्ही ‘टीम ‘ म्हणून एकत्र काम करीत जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू 

निलेशजींच्या रूपाने एका उमद्या नेत्याला जिल्ह्याने संधी दिली 

सावंतवाडी : 

सावंतवाडीतील हा पर्यटन महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव होणार नाही असं नाही. तो निश्चितच होईल. पर्यटनदृष्ट्या सक्षम प्रत्येक भागात महोत्सव होतील. सिंधुरत्न योजनेतून त्यांना निधी दिला जाईल. या महोत्सवामागे केवळ मनोरंजन नाही तर रोजगार निर्मितीचाही हेतू होता. जगभरातील महोत्सवासारखे महोत्सव आपण तिघेही एकत्र येऊन व खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात करू, असे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष आभार आहेत की त्यांनी एक उमदा नेता ज्यांनी खासदार म्हणून देखील चांगलं काम केलं होतं त्यांना आमदार म्हणून तेवढ्यात चांगल्या मतांनी पुन्हा एकदा संधी दिली. यापुढे आम्ही सर्वजण टीम म्हणून एकत्र काम करू. पर्यटनाच्या माध्यमातून व विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा चेहरा मोहरा पालटण्याची ताकद आमच्यात आहे. येणाऱ्या काळात ते दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, सावंतवाडी महोत्सव सुरू करण्यामागचा हेतू हा होता की पर्यटक येत असताना केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न पाहता येथील महिलांना त्यातून रोजगार निर्माण व्हावा स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वर्षाच्या शेवटी या महिन्यात सर्वत्रच पर्यटन बहरलेल असतं. त्यामुळे मोठा पर्यटन महोत्सव हा ज्यावेळी स्लॅक सीजन असतो त्यावेळी घ्यायचा असतो. जगभरातील सर्व पर्यटन महोत्सव त्याचवेळी होत असतात. आपल्याकडे जेव्हा आंबा व फणसाचा सीजन असतो त्यावेळी असे महोत्सव घेतल्यास त्याचा फायदा पर्यटकांबरोबरच स्थानिकांना देखील होईल. त्या दृष्टीने आम्ही सर्वजण एकत्र येऊन पुढची दिशा ठरवू त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे देखील मार्गदर्शन घेऊ असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.