कचरा नेमका टाकतोय कोण, प्रश्न अनुत्तरीत, दुर्गंधीचा वाहनचालकांना होतोय त्रास
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांमध्ये कचरा फेकणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. भोस्ते घाटातील वळणालगतच्या मोकळ्या जागेतही सर्रासपणे कचरा टाकला जात आहे. कचऱ्याचे ढीग जाळले जात असल्याने कचरा धुमसत आहेत. धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा कचरा नेमका टाकतो कोण, याचा उलगडा अद्याप तरी झालेला नाही. महामार्गावरील बहुतांश गावांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागोच उपलब्ध नसल्याने कचराप्रश्न ऐरणीवर आला आहे.
महामार्गावरील वेरळ रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतही सर्रासपणे कचरा टाकला जात असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. भरणे परिसरातील कचरा देखील भरणे येथील जगबुडी पुलाजवळील मोकळ्या जागेत कचरा टाकून जाळला जात आहे. याठिकाणी धुमसणाऱ्या कचऱ्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पाठोपाठच भोस्ते घाटातील अवघड वळणावरील मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगच्या ढीग साचले आहेत. येथे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कचरा जाळला जात आहे. धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी कचरा टाकण्यासाठी कोणीही परवानगी दिलेली नसतानाही कचरा नेमका टाकतो कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणार तरी कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आधीच भोस्ते घाट सतत घडणाऱ्या अपघातांनी चर्चेत आलेले असतानाच आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळेही नव्या चर्चेची भर पडली आहे.







