पिंगुळी येथील प. पू. सद्गुरु राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये झाली चोरी

कुडाळ प्रतिनिधी
पिंगुळी येथील प.पू. समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरासह प. पू. समर्थ अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरांमध्ये ५ लाख ३८ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या चोरीमध्ये चांदीच्या मुर्त्या तसेच फंड पेटीमधील रोख रक्कम चोरीला गेली आहे. दरम्यान कुडाळ पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र हे श्वान पथक रेल्वे रुळाच्या दिशेने गेले आणि त्या ठिकाणी घुटमळले. या चोरीमध्ये चौघे युवक असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसून आले आहे.

पिंगुळी येथील प. पू. समर्थ राऊळ महाराज मठामध्ये चोरी झाल्याची ही पहिली घटना आहे. या चोरीबाबत सद्गुरु राऊळ महाराज संस्थांचे उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी ही चोरी पहाटे २:४९ वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. या चोरीमध्ये प. पू. सद्गुरु राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरामधील १ लाख रुपये किमतीची राऊळ महाराज यांची चांदीची मूर्ती, २० हजार रुपये किमतीची एक स्टीलची फंड पेटी, ५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे ताट तसेच प. पू. सद्गुरु अण्णा महाराज समाधी मंदिरामधील १० हजार रुपये किमतीची एक लाकडी फंड पेटी, तसेच ३ लाख ९८ हजार रुपयांची प. पू. अण्णा महाराज यांच्या चांदीच्या पादुका, ५ हजार रुपये किमतीची एक दत्त महाराज यांची पूर्णाकृती चांदीची मूर्ती चोरीला गेली आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

चोरी करणारे चौघे युवक

सद्गुरु राऊळ महाराज यांच्या मठामध्ये सभोवताली भिंती आहेत. दरम्यान या चोरट्याने चोरी सद्गुरु अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिराच्या जवळून असलेल्या मार्गाने मंदिर परिसरात येऊन सद्गुरु अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिरातील चांदीच्या पादुका, मूर्ती, फंडपेटी तसेच नंतर सद्गुरु राऊळ महाराज यांच्या मंदिरातमधील औदुंबर झाडाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वाराचा दरवाजा उघडून त्यामधील सद्गुरु राऊळ महाराज यांची चांदीची मूर्ती तसेच चांदीचे ताट, फंडपेटी चोरून घेऊन गेले या ठिकाणी वापरली जाणारी हार्मोनियम सुद्धा त्यांनी चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या वस्तू त्यांनी चोरून घेऊन गेल्यावर रेल्वे रुळाच्या जवळ टाकल्या होत्या या चोरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चौघेजण चोर असल्याचे दिसून येत असून या चौघांनीही आपले चेहरे आणि पूर्ण शरीर झाकून घेतल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षा रक्षक झोपले, त्यानंतर झाली चोरी

दरम्यान राऊळ महाराज मठामध्ये सुरक्षारक्षक कार्यरत असतो. रात्री अडीच वाजेपर्यंत हे सुरक्षारक्षक जागे होते. या दरम्याने काही भक्त या ठिकाणी असलेल्या भक्त निवासात राहण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी भक्त निवासाच्या खोल्यांच्या चाव्या दिल्याचेही पुढे आले आहे. त्यानंतर ते झोपले आणि चोरांनी संधी साधून मंदिरामध्ये चोरी केली.

भक्त निवासामध्ये ११ भक्त होते राहायला

या ठिकाणी असलेल्या भक्त निवासामध्ये ११ भक्त निवासामध्ये राहायला होते मात्र कोणालाही या चोरांची भनक किंवा दरवाजा चघडण्याचा आवाज आला नाही. पहाटेच्या सुमारास ही चोरी करून हे चोर सावंतवाडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे रुळाच्या ठिकाणी गेल्याचे श्वानपथकाने काढलेल्या मागावरून उघड होत आहे मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही भाविकांना पोलिसांना मिळालेला नाही.

ठसे तज्ञांनी केली तपासणी

दरम्यान या चोरीमध्ये चोरट्याने फंड पेटी तसेच हार्मोनियम घेऊन गेले होते आणि हे सगळं साहित्य त्यांनी टाकून पळ काढला हे साहित्य पोलिसांनी एकत्र करून ठसे तज्ञान मार्फत त्याची तपासणी करण्यात आली. या चोरीबाबत या ठिकाणी असलेले पुजारी दिनेश ठाकूर यांनी उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांना संपर्क साधून घडलेल्या चोरीची माहिती दिली त्यानंतर दशरथ राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.