९ जानेवारील अच्युत गोडबोले यांचे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे व्याख्यान  

व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर यांची माहिती

कणकवली : कणकवली येथे गुरुवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली येथे सुप्रसिध्द लेखक व अर्थतज्ञ , व्याख्याते अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरचे व्यख्यान हे कणकवली व्यापारी संघाच्यावतीने कृत्रिम बुध्दीमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान – संधी व आव्हाने या विषयावर असणार आहे. याबाबतची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली.

 

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी संघाच्यावतीने पहिल्यांदाच व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यान मालेच्या शुभारंभ प्रसंगी व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर व जिल्ह्यातील व्यापारी उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी ते कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राजन पारकर, सेक्रेटरी विलास कोरगावकर, खजिनदार मंगेश कामत, निवृत्ती धडाम, दयानंद उबाळे, उपस्थित होते.

 

आधुनिक जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर हा अपरिहार्य झालेला आहे. तंत्रज्ञानातून चांगल्या संधी उपलब्ध होत असतात. तसेच त्यासोबत काही नवीन आव्हाने सुद्धा निर्माण होत असतात. त्यातील सध्या वेगाने पसरत असणारे तंत्रज्ञान म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्यापार व्यवस्थापनात कसा करणे शक्य आहे, या संबंधीचा उहापोह होणे गरजेचे असून सामान्य माणसाला तंत्रज्ञानाची ओळख होण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका व्यापारी संघाच्या विद्यमाने पहिल्यांदाच अशी व्याख्यानमाला आयोजित होत आहे. तरी कणकवली तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने सल्लागार अशोक करंबेळकर यांनी केले आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा बदलत्या व्यापार व्यवस्थापनातील वापर भविष्यातील व्यापारमित्र एआय संबंधी अधिक समजून घेण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी व अन्य विविध वर्गातील नागरिकांसाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक व्याख्याते अच्युत गोडबोले हे त्याविषयावर सखोल माहिती देणार आहेत. त्यानंतर उपस्थितांकडून संबंधित विषयांवर प्रश्न असतील तर, त्याविषयाची उत्तरे श्री. गोडबोले देणार आहेत.