सावंतवाडी : प्रतिनिधी
इन्सुली सावंत टेंब परिसरात दारू फॅक्टरी जवळ रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे रस्त्यावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
स्थानिकांकडून याबाबत माहिती देऊनही संबंधित हायवे विभागाकडून तात्काळ कोणतीही दखल घेण्यात आली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ तसेच उत्कर्ष युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ट्रॅक्टर व मनुष्यबळाच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड हटविले. त्यामुळे काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
यावेळी उत्कर्ष युवक मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र म. पालव, अविनाश हेरेकर, संकेत राऊळ, निशांत पालव, उमेश पालव, धीरज पालव, गणेश गावडे, सचिन दळवी, नाना परब आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्थानिकांच्या मदतीने वेळेत कार्यवाही झाल्याने मोठा अपघात टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.










