खेड (प्रतिनिधी) खेड राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी ऐनवरेचे माजी सरपंच संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत निष्ठेने काम करणाऱ्या जाधव यांनी संघटना बळकटीसाठी भरीव योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी शासनदरबारी तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. संघटना वाढीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जि. प. चे माजी विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष स. तु. कदम, तालुका सचिव प्रफुल्ल मोरे, राजेश चोचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबाबत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांना एकसंघ करत संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले आहे.










