सह्याद्री ‘चा कला जीवनगौरव पुरस्कार मणेरी यांना जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी):-सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्यावतीने दिला जाणारा कला जीवन गौरव पुरस्कार रायगड येथील कला शिक्षक सलीम मणेरी यांना जाहीर झाला आहे. त्याचे वितरण १५ ते २० जानेवारीदरम्यान सावर्डे येथील शिक्षणमहर्षी स्व. गोविंदरावजी निकम सभागृहात होणाऱ्या ३१ व्या वार्षिक कला प्रदर्शनात होणार आहे. तसेच वार्षिक पारितोषिक वितरणही होणार आहे.

दरवर्षी कला प्रदर्शनाचे औचित्य साधून शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते. त्यांमुळे यावर्षी हा पुरस्कार मणेरी यांना जाहीर झाला आहे.

 

मणेरी हे अंजूमन खैरूल इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील निमसाखर या गावात गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण एन.ई.एस. हायस्कूल निमसाखर येथे झाले.

पुढील कलेचे शिक्षण त्यांनी कलाविश्व सांगली या कला महाविद्यालयात घेतले. त्यानंतर जी. डी. आर्ट व कला व्यवसाय केंद्र सोलापूर येथे ए.टी.डी पूर्ण केल्यानंतर ए. के. आय. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव येथे दोन वर्षे तात्पुरते तर १९९३ सालापासून पूर्णवळ ते कला शिक्षक म्हणून कार्यरत झाले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

यावर्षीच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे कोल्हापूरचे चित्रकार बबन माने, संतोष पोवार, चिपळुणातील शिल्पकार संदीप ताम्हणकर, सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन प्रकाश राजेशिर्के, संस्थेचे सचिव महेश महाडिक आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ६०० कलाकृती मांडल्या जाणार असल्याचे सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य माणिक यादव यांनी कळविले आहे.