आमदार जीत आरोलकर यांची माहिती
पेडणे (प्रतिनिधी) :पेडणे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. शिवाय ज्या पद्धतीने राज्यात कला अकादमीचे थिएटर आहे त्याच धर्तीवर सुसज्ज असे रवींद्र भवन तुयेत सरकारी जागेमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली. कलाकारांनी रवींद्र भवनच्या वास्तू रचनेत बदल सुचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आ. जीत आरोलकर यांनी आपल्या कार्यालयात पेडणे तालुक्यातील निवडक कलाकारांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. पेडणे तालुक्यासाठी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी एकूण ५० हजार चौरस मीटर जागेमध्ये भव्य असे रवींद्र भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने कला आणि संस्कृती खात्याने मंजुरी दिल्याची माहिती दिली. या रवींद्र भवनमध्ये पेडणे तालुक्यातील पर्यायाने राज्यातील अनेक कलाकारांना सोयीसुविधा बाबत महत्त्वाच्या सूचना करण्याची गरज आहे. रवींद्र भवनमध्ये एकूण चार थिएटर, एक ओपन रंगमंच शिवाय प्ले गार्डन आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे आ. जीत आरोलकर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राजमोहन शेट्ये, निवृत्ती शिरोडकर, उमेश गाड, नरेंद्र नाईक, हरी शेटगावकर, उमेश आगरवाडेकर, प्रसन्न कुमार शेटगावकर, सुभाष आसोलकर, पॉल डिसोजा, महादेव हरमलकर, दत्ताराम ठाकूर, योगेश काळोजी, सागर तिळवे, संजय मयेकर, आयरिश डिसोजा, विलास परब, निलेश नाईक, आयरिश फर्नांडिस आदी कलाकार उपस्थित होते.
तुये येथील नियोजित रवींद्र भवन परिसरात कलाकारांसाठी सोयीसुविधा बरोबरच परराज्यातील प्रशिक्षक, शिक्षक, कलाकार यांना राहण्यासाठी तारांकित सोय करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याची सोय शिवाय गुरुकुल पद्धतीने कलाकारांना वेगवेगळे शिक्षण देण्याची सोय रवींद्र भवनमध्ये असणार आहे. यासाठी कलाकारांना सूचना किंवा बदल सुचवायचा असेल त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी आ. जीत आरोलकर यांनी केले.











