कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्यानंतर कणकवली (Kankavli) आणि देवगड (Devgad) किनारपट्टीवरील बांगलादेशी नागरिकांच्या तपास मोहिमेला गती मिळाली आहे. देवगड (Devgad) मधील विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मजूर वर्गामध्ये बांगलादेशी नागरिक आहेत का, याची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पश्चिम बंगालमधील नागरिक असलेल्या, देवगड मध्ये विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या व्यक्तींना कागदपत्रांसह देवगड पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी ताब्यात घेतली आहेत. तपासणी (Investigation) दरम्यान, हे मजूर भारताचे नागरिक आहेत की नाही, याची प्राथमिक पडताळणी करण्यात येत आहे.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही आस्थापनेत भारताबाहेरील नागरिक असल्यास त्याची दखल घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, देवगड शहरात बांगलादेशी नागरिक नसल्याची खातरजमा करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, आज सुमारे 20 मजुरांना देवगड पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी निलेश पाटील उपस्थित होते. मात्र आजच्या प्रार्थमिक तपासणीत कुणीही संशयास्पद व्यक्ती सापडलेला नाही.












