पैश्याच्या वादावरून मित्रानेच केला मित्राचा खून…

घटनेमुळे अतिग्रे व चोकाक परिसरात भीतीचे वातावरण…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

हातकणंगले: तालुक्यातील विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे (वय ३०) याचा मोबाईल खरेदीच्या पैशावरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी कोल्हापूर-सांगली मार्गावरील चोकाक येथील पुलाखाली ही घटना उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद मुसळे हा ठेकेदारी काम करत होता. सायंकाळी तो चोकाक येथील पुलाखालील मित्र तुषार रवींद्र लोहार (वय ३५, रा. चोकाक) याच्यासोबत खूप उशिरा मद्यपान करत बसला होता. यावेळी मोबाईल खरेदीच्या पैश्यावरून दोघांत वाद निर्माण झाला.हा वाद काही वेळातच तीव्र झाल्याने संतापाच्या भरात तुषार लोहार याने मुसळे यांच्या डोक्यात दगड घालून मुसळे यांना गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान तेथे असलेल्या कामगारांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेंगाने व त्यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेत जखमी मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मुसळे यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळतात अप्पर पोलिस अधीक्षक आप्पासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटना स्थळी भेट देत तपासाला गती दिली. चोकाक पुलाखाली परिसरात व्यसनी लोकांचा वावर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

दरम्यान संशय तुषार लोहार यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे अतिग्रे व चोकाक परिसरात मोठे खळबळ उडाली आहे