माजगाव सरपंचपदासाठी रंजना कानसे व जयश्री सावंत यांच्यात थेट लढत

दोन उमेदवारांनी माघार : दोन सदस्य बिनविरोध

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी रंजना रवींद्र कानसे आणि जयश्री दिनेश सावंत यांच्यात दुरंगी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ही लढत भाजप पुरस्कृत विरुद्ध अपक्ष अशी रंगणार आहे.

​सरपंचपदासाठी रंजना कानसे, जयश्री सावंत, श्रद्धा मुकुंद सावंत आणि सपना सतीश गावडे या चौघींचे अर्ज दाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी श्रद्धा सावंत आणि सपना गावडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता मैदानात दोनच उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

​दुसरीकडे, ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक ४ मधून राजीवी रुपेश पेडणेकर यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. तर वॉर्ड क्रमांक २ मधून शिल्पा शशिकांत साळगावकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अनघा प्रदीप धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी यशवंत परब कामकाज पाहत आहेत.