तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिपी वेंगुर्ले येथे कारवाई
वेंगुर्ले : प्रतिनिधी
चिपी-परुळे विमानतळ परिसरात चिपी वेंगुर्ले रस्ता येथे अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक करणारे आठ डंपर वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या ग्राममहसूल अधिकारी परुळे राहुल गवते, ग्राम महसूल अधिकारी रावदस रजनीकांत नायकोडे, ग्राम महसूल अधिकारी कोचरा सायली आंदुर्लेकर, ग्राम महसूल सेवक (कोतवाल) परुळे रुक्मानंद वरक या पथकाने पकडून दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार वेंगुर्ले कार्यालय येथे आणले आहेत. प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार सोमवारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.
दुपारी सुमारे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास सादर डंम्पर वाळू वाहतूक करताना या महसूलच्या पथकाने त्यांची तपासणी केली. त्यामध्ये अनधिकृतपणे गौण खनिज वाळू भरलेली आढळून आल्याने सदरचे डंम्पर पकडुन तहसिलदार कार्यालयाचे आवारामध्ये आणून उभे केलेले आहेत. सदर डंपर मधून वाळू विनापरवाना वहन करत होते का, तसेच सदर डंपर मधून विनापरवाना वहन करत असलेल्या गौणखनिजावर दंड आकारणीची कारवाई सुरु आहे. त्यांचेकडून गौणखनिजांवरील दंडाची रक्कम शासनाकडे जमा करुन घेणे व अनधिकृत गौणखनिज वाहतुकीसाठी वापरणेत आलेल्या वाहनांवर शास्ती करणेकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) (2) मधील तरतुदीनुसार प्रस्ताव तहसीलदार विभागाकडून प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.












