ग्रामदैवतांना साकडे घालून प्रचाराचा नारळ
महायुतीच्या नेत्यांची माजगावमध्ये शक्तीप्रदर्शन
सावंतवाडी | प्रतिनिधी :
माजगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रंजना कानसे यांच्या निवडणूक प्रचाराचा मंगळवारी अत्यंत उत्साही वातावरणात शुभारंभ करण्यात आला. गावातील ग्रामदैवत श्री देव महादेव आणि श्री देवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवून व विजयाचे गाऱ्हाणे घालून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्यात आली.
सकाळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजगावच्या श्री देव महादेव मंदिरात एकत्र येत दर्शन घेतले. त्यानंतर श्री देवी सातेरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन विजयासाठी आशीर्वाद मागितला. “गावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, रंजना कानसे यांच्या रूपाने समर्थ नेतृत्व माजगावला मिळेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रचार शुभारंभाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जि.प. माजी अध्यक्षा श्रीमती रेश्मा सावंत, भाजपा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, सरचिटणीस महेश धुरी, उपसरपंच रिची डिमेलो, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकले.
गावच्या विकासासाठी महायुती सज्ज
देवदर्शनानंतर रंजना कानसे यांच्या प्रचार रॅलीला भव्य स्वरूपात सुरुवात झाली. यावेळी माजी सरपंच श्री. हरमलकर, आर. के. सावंत सर, संजय कानसे, सुरेश सावंत, तातू सावंत, विष्णू वेजरे, रामदास भोगण, विशाल लाड, श्री. रेडकर, संजय माजगावकर, विष्णू गावडे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क सुरू केला आहे. माजगावच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी रंजना कानसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या निमित्ताने माजगावमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.











