खेड (प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेने थकित पाणीपट्टीधारकांविरोधात नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतल्यापासून थकितदारांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषदेच्या पाणी विभागाच्या पथकाने ४९ जणांचा पाणीपुरवठा खंडित केला होता. यातील २१ जणांनी पाणीपट्टी भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आणखी ६ थकितदारांनी पाणीपट्टी भरणा केल्याची माहिती देण्यात आली. त्यांचाही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या १५ दिवसांपासून न. प. राबवत असलेल्या मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना दणका देण्यात येत आहे. थेट पाणीपुरवठाच खंडित करण्यात येत असल्याने थकित पाणीपट्टीधारकांचे धाबे दणाणले आहेत. पथकाने मोहीम तीव्र केल्याने पाणीपट्टी भरण्यासाठी थकितदारांनी पावले नगरपरिषद कार्यालयात वळत आहेत.











