लाइफ सेट… कारण फ्रेंड्स परफेक्ट! खेडच्या चार जिवलग मित्रांची मैत्री, निष्ठा आणि नेतृत्वाची अनोखी कहाणी

राकेश कोळी
खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शहरातील तीन बत्ती नाका परिसरात लागलेला बॅनर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. कारण हा बॅनर केवळ राजकीय प्रचाराचा नव्हता, तर जिवलग मित्रांच्या निष्ठेचे प्रतीक होता. शिवसेनेचे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे निष्ठावंत म्हणून शहरात परिचित असलेले राजेश बुटाला, संजय मोदी, मिनार चिखले आणि डॉक्टर उपेंद्र तलाठी या चौघांची मैत्री खेड शहराच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात एक वेगळी छाप पाडणारी आहे.
आपापल्या क्षेत्रात यशस्वी असताना त्यांनी आपली मैत्री आजपर्यंत जपून ठेवली. शिमगोत्सव असो वा कोणताही सामाजिक उपक्रम या चौघांपैकी एक जरी दिसला तरी उर्वरित तिघे जवळपास तिथे असतीलच, अशी शहरवासीयांची खात्रीच झाली आहे. सुख-दुःखात साथ देणारी ही ‘परफेक्ट फ्रेंड्स’ ची टीम राजकारणातही तेवढीच एकत्र आणि सक्रिय राहिली आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी माधवी राजेश बुटाला यांची नगराध्यक्षपदी उमेदवारी जाहीर केली तेव्हा या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक सक्रिय पाठींबा देणारे चेहरे होते ते संजय मोदी, मिनार चिखले आणि राजेश बुटाला. तर नेहमीप्रमाणे अदृश्य शक्ती, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची साथ या तिघां सोबत कायम होती.
डॉक्टर उपेंद्र तलाठी हे व्यक्तिमत्व राजकारणातील प्रकाशझोतात कधी दिसले नाही, परंतु खेडचे राजकारण त्यांच्या नावाशिवाय कधीही पूर्ण होत नाही, असे जाणकारांचे मत. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर कोण बाजी मारणार हे सर्वात आधी आणि निःसंकोचपणे सांगणारे डॉक्टर उपेंद्र हे खेडमधील एकमेव व्यक्तिमत्व मानले जाते.
निवडणूक प्रमुख म्हणून संजय मोदी आणि मिनार चिखले यांनी उत्कृष्ट समन्वय, नियोजन आणि मैदानातली कामगिरी बजावली. परिणामी महायुतीला एकहाती सत्ता मिळवून देण्यात ते यशस्वी झालेच; शिवाय माधवी बुटाला यांना नगराध्यक्षपदी यशस्वीपणे विराजमान करण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
या कार्याची दखल घेत पक्षाने संजय मोदी आणि मिनार चिखले यांना स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी सोपवली. पद जाहीर होताच मित्रांमधील आनंद लपून राहिला नाही. एकमेकांचे अभिनंदन, समाधान आणि अभिमान या सर्वांचा परिपूर्ण मिलाफ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खरेतर या दोघांनी यापूर्वी देखील नगरसेवक पदाची धुरा सांभाळली असून जनतेतून भरघोस मतांनी निवडून आले होते. मात्र पक्षादेश आणि पक्ष निष्ठा म्हणून भाईंनी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक न लढवता प्रचार प्रमुखाची धुरा सांभाळली आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालेत. त्यामुळे नगरसेवक पदापेक्षा देखील पक्षाने दिलेला स्वीकृत नगरसेवक पदाचा बहुमान हा त्यांच्यासाठी जास्त मोलाचा असल्याचे देखील यावेळी जाणवले.
या चार मित्रांची एकजूट, त्यांची जिद्द, निष्ठा आणि निरपेक्ष मैत्री पाहून अनेकांनी एकच वाक्य उच्चारले—
“लाइफ सेट… कारण फ्रेंड्स परफेक्ट!”