जागा नावावर करुन देण्यासाठी गोळप येथे मद्यप्राशन केलेल्या तरुणाची तीन महिलांना मारहाण

रत्नगिरी | प्रतिनिधी

तालुक्यातील गोळप येथे दारुच्या नशेत येउन फिर्यादी महिलेची मावशी रहात असलेली जागा नावावर करुन देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या मावशीला, फिर्यादीला तसेच तिच्या जाउला मारहाण केली. ही घटना बुधवार 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.

चंदन चंद्रकांत पावसकर (31) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादी महिलेने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित चंदन पावसकर हा दारुच्या नशेत आला. त्यानंतर त्याने फिर्यादीची मावशी रहात असलेली जागा नावावर करुन देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या मावशीला लाथाबुकक्यांनी व हातांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या जाउला कोयती मारुन व फिर्यादी महिलेला लाकडाने पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (1),115 (2) 352, 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.