भेटीसाठी आलेल्या मच्छिमार महिलांना केले आवाहन
रत्नागिरी । प्रतिनिधी :
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा बंदर विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये आकसापोटी कोणतीही कारवाई होत नसून मिरकरवाडा येथे मलपीपेक्षाही मोठे सुसज्ज व अत्याधुनिक बंदर उभे राहणार आहे, त्यामुळे विरोध करू नका असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मिरकरवाडा येथील मच्छिमारांना केले आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवरील सुमारे तिनशेहून अधिक अतिक्रमणे हटवण्याची नोटीस मत्स्य विभागाने काढली आहे. त्यामुळे गुरुवारी महिला मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. तर शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरी दौर्यावर आले असता, त्यांची विश्रामगृहावर मच्छीमार बांधव व महिलांनी भेट घेतली व कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली. मात्र यावेळी पालकमंत्र्यांनी या मच्छीमारांना बंदराच्या विकासाबाबतची संकल्पना त्यांना समजावून सांगितले. आपल्याच कालावधीत जवळपास वीस ते पंचवीस वेळा कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रत्यकवेळी अतिक्रमणे उभारली गेली. मात्र आता मच्छीमारांनाच फायदा व्हावा, बंदराचा विकास व्हावा यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी धोरणे आखली आहेत. यात कोणताही आकस ठेवून कारवाई केली जात नाही. आपणही त्यावेळी बैठकीला उपस्थित होतो. भविष्यात येथे मोठे बंदर उभे राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, मत्स्य विभाग तातडीने कारवाई करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मत्स्य बंदर असल्याने मलपीपेक्षाही मोठे आणि सुसज्ज बंदर उभारले जाणार आहे. जवळपास पाचशे कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. मच्छीमारांच्या भावना आपण ना. राणे यांना सांगू, कोणावरही अन्याय होणार नाही असेही त्यांनी सांगितले.












