नवे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे हजर होणार
सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग नगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मनोज जोशी यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता डॉ. अनंत डवंगे हे हजर होत आहेत. डॉ.जोशी यांच्या कार्यपद्धतीबाबत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. बदली झाल्याच्या समजतात वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नागरिकांच्या वैद्यकीय सेवेबरोबरच प्रशासकीय कामकाजातही विस्कळीतपणा झाला होता. वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अनेक कामातील त्यांचे अर्थकारण व त्यामुळे यंत्रणेतील लोकांना होणारा त्रास याबाबतच्या अनेक तक्रारी शासनाकडे गेल्या होत्या. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचेकडे ही या तक्रारी आल्या होत्या. कालच मुंबई मंत्रालयात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोग्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली होती. त्यातही याबाबत गांभीर्याने चर्चा झाली.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक अडचणी आहे. रिक्त पदे, अपुरी पडणारी जागा, नवीन बांधकामे, यातून मार्ग काढण्यासाठी डॉक्टर जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. उलट त्यांच्या विरोधात सर्वांच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे शासनाला याबाबतची दखल घ्यावी लागली. या बदलामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजात थोडे सुधारणा होईल नागरिकांना सेवा मिळताना अडचणी कमी होतील व अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल अशी अपेक्षा आता व्यक्त झाली आहे.










