खेड(प्रतिनिधी)
लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या शेकडो परप्रांतीय कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने बंद कारखान्यात अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. मनसेचे तालुकाध्यक्ष नीलेश बामणे यांच्या तत्परतेने सर्व कामगारांची सुटका करण्यात आली. ‘त्या’ ठेकेदाराकडून कामगारांना मारहाणीसह निकृष्ट दर्जाचे जेवण -देत हालअपेष्टाही केल्या जात होत्या, असा आरोपही पिडित कामगारांनी केला आहे.
एका कंपनीत शेकडो परप्रांतीय कामगार एका ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करत होते. या कामगारांना निकृष्ट दर्जाचे व तुटपुंजे जेवण दिले जात होते. तसेच मारहाण ही केली जात होती असा आरोप कामगारांनी केला
हे कामगार कुठेही जावू नयेत, यासाठी त्यांच्याकडील आधारकार्ड, मोबाईल व रोकडही ठेकेदाराने काढून घेत स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. या ठेकेदाराच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी एका कामगाराने पळ काढल्यानंतर हा सारा प्रकार उघड झाला. ही बाब मनसेचे तालुकाध्यक्ष नीलेश बामणे यांना समजताच तातडीने पोहचून बंद कारखान्यात डाबून ठेवलेल्या सर्व कामगारांची सुटका करत संबंधित ठेकेदाराची कानउघडणी केली.










