निवेंडी येथे मँगो पार्क उभारताना जागेचा दर जाहीर करण्यात यावा

भूसंपादीत शेतकर्‍यांनी केली प्रशासनाकडे मागणी 

रत्नागिरी : 
तालुक्यातील निवेंडी येथे मँगो पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीकडून जागांचे भूसंपादन करण्यात येत आहे. या जागांची नाममात्र दरात शासनाकडून खरेदी केली जाण्याची भिती जागा मालकांना असून, स्थानिक शेतकर्‍यांकडून संमतीपत्र लिहून घेण्यापूर्वी जागेचा दर जाहीर करण्यात यावा अशी मागणी निवेंडी येथील भूसंपादीत शेतकर्‍यांनी केली आहे. या शेतकर्‍यांनी गुरुवारी  याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जीवन देसाई यांना दिले.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात निवेंडी येथे मँगो पार्क आणि दापोलीत फिशपार्कटची घोषणा केली होती. त्यानंतर रत्नागिरीतील निवेंडीमध्ये या मँगो पार्कसाठी जागाही निश्चित करण्यात आली. सध्या या जागांचे भूसंपादन सुरु करण्यात आले आहे. त्यातच काही लोक गरीब शेतकर्‍यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून जागा खरेदी करीत आहेत. त्यामुळे शासनाकडून दर जाहीर झाल्यास शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही अशी मागणीही शेतकर्‍यांची आहे.

गुरुवारी निवेंडी येथील शेतकरी दिलीप जोशी, अजय शिरगावकर, शाम आग्रे, विश्वनाथ बळकटे, शशिकांत देसाई, सहदेव भुते यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी प्रांताधिकारी जीवन देसाई यांची भेट घेऊन स्थानिक शेतकर्‍यांकडून संमतीपत्र लिहून घेण्यापूर्वी दर जाहीर करावा अशी मागणी केली. यावर प्रांताधिकार्‍यांनी लवकरच दर जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले.