योगा व व्यायाम सत्राने वेंगुर्ला शहरात तंदुरुस्ती आणि जागरूकतेचा जागर
वेंगुर्ले | प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला, युवक शरीर सौष्ठव संवर्धन संस्था,वेंगुर्ला, श्री सातेरी व्यायामशाळा, वेंगुर्ला व सोन्सूरकर फिटनेस शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सुदृढ वेंगुर्ला’ या संकल्पनेच्या अनुषंगाने रविवारी सकाळी ७ वाजता जलबांदेश्वर, वेंगुर्ला येथे विशेष “बीच वर्कआउट इव्हेंट” कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्या हस्ते हनुमान मूर्ती व जल पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित नागरिकांसाठी योगा व व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून सुप्रसिद्ध फिटनेस प्रशिक्षक श्री. किशोर शांताराम सोन्सुरकर, योगशिक्षक श्री.बाबली गवंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना समुद्रकिनारी व्यायाम करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. प्रशिक्षकांनी योगासने, स्ट्रेचिंग, कार्डिओ, क्रॉसफीट इत्यादी व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतली.
सदर शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुकटे, लाईनस क्लब, वेंगुर्ल्याच्या अध्यक्षा श्रीम.पल्लवी कामत, श्रीम.ऊर्मिला सावंत, श्रीम.मृण्मयी कारेकर, श्रीम.हेमा गावस्कर, श्री सातेरी व्यायामशाळा संचालिका सौ.अबोली किशोर सोन्सूरकर,
प्रशिक्षक श्री.अंकित किशोर सोन्सूरकर, वेंगुर्ल्यातील नागरिकांनी, व्यायाम पट्टूंनी व वेंगुर्ला नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध वयोगटातील पुरुष व महिलांनी यात भाग घेतला व समुद्रकिनाऱ्यावर तंदुरुस्ती वाढवण्यासाठी व्यायाम सत्रात सक्रिय सहभाग घेतला. या अनोख्या उपक्रमामुळे वेंगुर्ला शहरात आरोग्य व स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रम समारोप प्रसंगी मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी श्री.सोन्सूरकर व त्यांच्या संपूर्ण टीम चे या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले व अशे उपक्रम नियमितपणे राबिवले जाण्याचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही केले









