कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल ‘रतन टाटा एक्सलन्स अवॉर्ड’ ने सन्मानित

मुंबई : प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल याना मानाचा ‘रतन टाटा एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला. दादर माटुंगा येथील कल्चरल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात दयानंद कुबल यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

दयानंद कुबल यांना हा पुरस्कार त्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल देण्यात आला. कोकण संस्थेच्या माध्यमातून दयानंद कुबल यांनी गेल्या १५ वर्षात ग्रामविकास, अनाथ मुले, आदिवासी पाड्यातील मुले, आरोग्यविषयक, स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो लोकांना मदत पोचवली आहे. जागतिक शाश्वत विकासाची उद्दिष्टे पुरी करताना तळागाळातील प्रकल्पना आणि गरजूंचे आयुष्यमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे.

येणारी नवीन पिढी उत्तम माणूस म्हणून घडवायची असेल तर मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना पाहिजे त्या वस्तू देऊन आपण त्यांना रोबोट घडवण्याचे काम करून कसे चालेल. त्यांच्या विचारात परिवर्तन केले तरच त्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. कोकण संस्था गेली १३ वर्षे करत असलेल्या कार्याबद्दल दयानंद कुबल यांना हा पुरस्कार देताना आनंद होत आहे असे गौरवोद्गार देशविदेशात हजारो व्यावसायिक घडवणारे रत्नाकर अहिरे यांनी सांगितले.

कोकण संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळालेत. मात्र सर रतन टाटांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असे दयानंद कुबल यांनी सांगितले. कोकण संस्थेला त्यांच्या कार्याबद्दल आज पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सर रतन टाटांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दयानंद कुबल यांचे सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.