सोशल मीडिया चा वापर सजगतेने करायला हवा : जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी

वेंगुर्ले l प्रतिनिधी :“पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करु शकेल. प्रिंट मीडीयाच्या काळात “वाचकांचा पत्रव्यवहारा” पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाइलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. मात्र सोशल मीडिया चा वापर सजगतेने करायला हवा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी अणसूर पाल हायस्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात काढले.

अणसूर पाल हायस्कूल अणसूर या विद्यालयाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम अणसूर पाल शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे श्री.निलेश अटक ,वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रमुख पाहुणे श्री.निलेश अटक यांनी बदलत्या जीवनशैलीत समतोल आहार, व्यायाम, खेळांचे महत्व अधोरेखित करीत, विद्यार्थी जडणघडणीत सजग पालकत्वाची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी संस्थाध्यक्ष श्री.आत्माराम गावडे यांनी’चांगला माणूस व देशभक्त नागरिक बनण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. दानशूर उद्योगपती जस्मिन आर्ट प्रिंटर्सचे दादासाहेब परुळकर यांनी आपल्या जीवनातील संघर्षाच्या काळात कष्ट,श्रम, मुल्ये यावर श्रद्धा ठेवून आत्मविश्वासच्या जोरावर मिळवीलेले यशाचे महत्व विद्यार्थ्याना सांगितले. यावेळी व्यासपिठावर शालेय समिती चेअरमन व माजी मुख्याध्यापक श्री.महादेव मातोंडकर, सदस्य श्री.दीपक गावडे, श्री.देऊ गावडे, श्री.दत्ताराम गावडे,पाल माजी सरपंच श्री.राजाराम गावडे, श्री.गजानन गावडे, आनंद उर्फ बिट्टू गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गतवर्षी सन २०२३-२४ मध्ये दहावीमध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा, मंदार बापू नाईक, यज्ञेश भास्कर गावडे, भुमिका अनंत राऊळ व विविध विषयात सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा देणगीदार रोख बक्षिसे, संस्था पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शालेय क्रिडा स्पर्धा,सहशालेय उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. प्रशालेतील इ.दहावीतील विद्यार्थिनी कु.धनश्री सुनिल गावडे हिची सन २०२४-२५ साठी ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून निवड करुन तीला संस्थाध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन, इशस्तवन व स्वागतगीताने झाली.याप्रसंगी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशालेत श्री.गजानन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिक कोर्सचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय ठाकर, प्रास्तविक व अहवालवाचन मुख्याध्यापक श्री.राजेश घाटवळ व बक्षिसवितरणाचे वाचन शिक्षिका सौ.चारुता परब तर आभार प्रदर्शन सौ.अक्षता पेडणेकर मॅडम यांनी केले. यानंतर ‘रंगशिशिर’ हा विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.