अ‍ॅड तुकाराम शिंदे यांनी घेतली शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट

माखजन | वार्ताहर : १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित झालेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढी च्या शासन निर्णयाची येत्या अधिवेशनात तरतूद व्हावी यासाठी महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे राज्य समन्वयक अ‍ॅड तुकाराम शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली

या भेटी प्रसंगी शिक्षक समन्वय संघाचे प्रा अनिल परदेशी, प्रा संतोष वाघ,प्रा कर्तारसिंग ठाकूर,प्रा राहुल कांबळे,गजानन खैरे,आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मंत्री मंडळाच्या १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयास अनुसरून राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक शाळांना वाढीव २०% टप्पा वाढीसाठी लागणारा निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावा अशी मागणी करण्यात आली आहे.पावसाळी अधिवेशनात सभागृहात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून २०२४ पासून फरकासह २०% वाढीव टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती.त्यानुसार लागणारा निधी येत्या अधिवेशनात मंजूर करून राज्यातील ६३ हजार अंशतः शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.शिवाय काही अडचणीमुळे त्रुटी मध्ये अडकलेल्या शाळांना व ज्यांनी ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केली आहे अशा शाळांना समान टप्यावर आणण्यासाठी लागणारा निधी देखील या अधिवेशनात मंजूर करावा अशी मागणी अ‍ॅड तुकाराम शिंदे यांनी केली.यावेळी दादा भुसे यांनी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी शिक्षण विभाग योग्य दिशेने कार्यवाही करत असल्याचे सांगितले व अधिवेशनात अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय दिला जाईल असे अ‍ॅड तुकाराम शिंदे यांना सांगितले.
अ‍ॅड तुकाराम शिंदे यांच्या नेतृत्वात शिक्षक समनव्य संघाने बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी देखील भेट घेतली.अ‍ॅड तुकाराम शिंदे यांनी मागील सरकारच्या काळात पाठपुरावा करत सेवा संरक्षण, सी.एम.पी.प्रणाली,१००% अनुदानावर बदली,समायोजन,टप्पा वाढ अनेक विषय मार्गी लावले आहेत.