मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल

शिरगाव (प्रतिनिधी)    देवगड तालुक्यातील पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांना कै. ज. भा. पेंढारकर सर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था, नेमळे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उपक्रमशिलतेची दखल घेऊन त्यांनी केलेल्या सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना कै. ज. भा. पेंढारकर सर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

या विशेष सोहळ्याला सावंतवाडी विधानसभेचे माजी आमदार शिवराम दळवी, संस्थाध्यक्ष आत्माराम राऊळ, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्रीमती कल्पना बोवलेकर, शिक्षकवृंद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

सत्यपाल लाडगावकर यांच्या या सन्मानामुळे पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या यशाबद्दल परिसरात आनंद आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.