देवगड तालुक्यातील आरा येथे दुहेरी दुर्घटना; जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले
कणकवली :
देवगड तालुक्यातील आरा येथे साप पकडताना सर्पमित्र राजेंद्र पंढरीनाथ पारकर (वय ६४) यांना सापाने दंश केल्याची घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी तातडीने उपचारासाठी स्वतःच्या सुमो गाडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रयाण केले. त्यांच्या सोबत गाडीत पत्नी आणि अन्य दोन व्यक्तीही उपस्थित होत्या.
दरम्यान, शिरगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षा व बोलेरो गाडीला त्यांच्या सुमोची धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर पारकर यांना तातडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्पदंश आणि अपघात अशा दुहेरी संकटांना पारकर यांना सामोरे जावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघात प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.













