सावंतवाडी : डेगवे गावचे माजी सरपंच आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागबा (बाबा ) डेमा देसाई (वय ९५) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने डेगवे गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. गावच्या विकासातील एक आधारस्तंभ हरपल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
नागबा देसाई यांनी आपल्या आयुष्यात विविध महत्त्वपूर्ण पदे भूषवली होती. ते डेगवे गावचे माजी सरपंच होते. यासोबतच त्यांनी डेगवे विकास सोसायटीचे अध्यक्षपद आणि देवस्थान उपसमितीचे उपाध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळले होते. भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला उर्वरित काळ पूर्णपणे गावच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यात समर्पित केला होता. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे गावाच्या अनेक विकासकामांना गती मिळाली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा डेगवेचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांचे वडील होत.
नागबा (बाबा) देसाई यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी डेगवे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.










