खाकीवर्दीचा ग्राम संवाद…!

 

पोलिस आपला मित्र, पोलिस आपल्या दारी असे अनेक जनतेशी जवळीकता निर्माण करणारे अनेक उपक्रम आजवर राबविण्यात आलेत. परंतु यातलं वास्तव शोधलं तर असे पोलिस आणि जनता यामध्ये स्नेह निर्माण करणारे उपक्रम कागदावर नेहमीच सुंदर दिसतात. परंतु प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नसते. आणि झालीच तर ती कागदावर आकडेवारी पूर्ण करण्यासाठी असते. पोलिस आणि पत्रकार कधी कोणाचे मित्र नसतात. याचे कारण कोणालाही कितीही आणि काहीही वाटलं तरीही पोलिसांना एखाद्याच्या हातून गुन्हा घडला असेल तर त्याला रेकॉर्डवर आणावाच लागतो. मग कारवाईत पोलिस कदाचित थोडीफार सूट देतीलही तसच पत्रकारालाही एखाद्या घटनेची बातमी दुर्लक्षिता येत नाही. त्यामुळे पोलिस आणि पत्रकारांची मैत्रीचा धागा समजून घेऊन मैत्री केली तर त्या मैत्रीत कधी कटुता येत नाही.


पोलिस आणि पत्रकारांच्या मैत्रीत कधी अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर मग अपेक्षाभंगाचे दु:,ख करण्याची वेळ येत नाही. आणि ‘मैत्री’ ही अबाधित रहाते. सिंधुदुर्ग पोलिसांनी यापलिकडे जात पोलिसांचा ग्राम संवाद हा उपक्रम हाती घेतला आहे. आणि खरोखरीच सिंधुदुर्ग पोलिसांनी हाती घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेच्या आज-काल सर्वांकडून सर्वसाधारण अपेक्षा आहे. फारकाही न्याय देण्याच्या आणि न्यायीकतेच्या फारशा अपेक्षा सामान्य माणूस ठेऊन नाही. याच कारणही तसच आहे. रोजच्या व्यावहारीक जगातील सामान्य माणूस जे अनुभव घेतो त्यावरच तो त्याच-त्याच मत बनवत असतो. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर सर्वसामान्याला खूप चांगले अनुभव येतात असे नाही. याचे कारण मिटवा-मिटवी करणारे समाजात जसे वावरत असतात तसे ते खाकीवर्दीतही दिसतात. मग प्रकरण कोणतेही असोत. यामुळे सर्वसामान्यांची पोलिसांकडून पोलिस स्टेशनला गेल्यावर भेदरलेल्या स्थितीतील माणसांशी दरडावण्याच्या भाषेपेक्षा चार शब्द पोलिसांकडे येणाऱ्याला विश्वासाचे असतील तर पोलिसांची विश्वासार्हता अधिक वाढेल. दुर्दैवाने असे अनुभव फार क्वचित ऐकायला मिळते. ही सगळी पार्श्वभूमी असताना सिंधुदुर्ग पोलिस दलातील वरिष्ठ आपल्या गावात येतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांशी बोलतात. शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करतात. निश्चितच हे चांगलच आहे. ग्रामीण भागातील अनेक खेडेगावात जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना कधी पाहिलेलही नसत. काही गावातून गुन्हेगारीच प्रमाण फारच नगण्य असल्याने सुदैवाने अशा गावांना कधी कोणत्याच पोलिस अधिकाऱ्याचे दर्शनच झालेले नसते. माणगाव खोऱ्यातील काही गावात तर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना या ‘ग्रामसंवादातून प्रथमच पहाण्याचा, भेटण्याचा योग आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सौरभुकुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अनेक गावातून स्वत: संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनीही काही गावांतून जात ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या-त्या पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांनीही या ग्रामसंवादातून ग्रामीण भागातील जनतेशी भेटी घेतल्या आहेत. या पोलिसांच्या ग्रामसंवादातून एक गोष्ट निश्चित आहे गावाची भौगोलिकता गावच सामाजिक वातावरण त्या-त्या गावातील विघ्नसंतोषी समाज विद्यातक प्रवृत्ती गाव जोडण्याचा प्रयत्न करणारे अशा सर्वांशी संवाद आणि त्यातून गावाच वास्तववादी चित्र निश्चितच वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून येईल. सायबर, क्राईम, आर्थिक फसवणुक होणाऱ्या प्रकारात वाढ होत आहे. आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी ग्रामस्थांनी, नागरीकांनी स्वत:ही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सिंधुदुर्गात तर डॉक्टर, शिक्षक अशा शिक्षित वर्गातही आर्थिक फसवणुक झाल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात पोलिसांचा सायबर विभाग खरोखरीच अधिक सतर्क आहे. सायबर विभागाकडून सातत्याने नागरीकांना आर्थिक फसवणुकीपासून सावध करण्याचे प्रयत्न होतच असतात. परंतु कधी-कधी शेअरमार्केटमधून दामदुप्पट पैसे मिळणार अशी काहीशी योजना सांगून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यातही पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा असते. पोलिसांच्या ग्रामसंवादातून पोलिसांबद्दल जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली. तरी देखील या संवादातून खूप काही साध्य होईल असे वाटते. खाकीवर्दीबद्दल समाजमनात जो अविश्वास वाढत चालला आहे तो थांबण्यास आणि वर्दीचा धाक आणि वर्दीबद्दलचा विश्वास या दोन्ही गोष्टी या संवादातून निश्चितच घडतील.