कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तीन तास पोस्टमार्टम रखडले

जनरेटर असूनही तीन तास रुग्णालय अंधारात; आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणारे कळंबणी बु. येथील उपजिल्हा रुग्णालय सध्या गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. नावाला उपजिल्हा रुग्णालय असले तरी प्रत्यक्षात येथील सुविधा अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.
दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी खेड तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नेहमीप्रमाणे लाईट गुल झाली होती. यामध्ये तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाची देखील लाईट गेली होती. यावेळी तालुक्यातील तळवट पाली येथून एका मृत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र यावेळी उपजिल्हा रुग्णालय पूर्णपणे अंधारात असल्याचे चित्र समोर आले. अशा परिस्थितीत रुग्णालयात दोन जनरेटर उपलब्ध असूनही पोस्टमार्टमसारखी अत्यावश्यक प्रक्रिया तब्बल तीन तास रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एक जनरेटर पूर्णपणे बंद अवस्थेत आहे, तर दुसरा जनरेटर सुरू स्थितीत असूनही त्यामध्ये डिझेल नसल्यामुळे तो चालवता आला नाही. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अंधारात राहिले आणि मृतदेह तीन तास पोस्टमार्टमसाठी प्रतीक्षेत ठेवावा लागला.
हा केवळ पोस्टमार्टमचा विषय नसून रुग्णांच्या जीवाशी थेट संबंधित प्रश्न आहे. याच वेळी एखादा गंभीर अपघातग्रस्त रुग्ण, आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीसाठी आलेली महिला रुग्णालयात दाखल झाली असती, तर अशा अंधारात आणि जनरेटर बंद अवस्थेत असताना अत्यावश्यक परिस्थितीतील रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नाही. अशा गंभीर परिस्थितीस जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शासकीय रुग्णालयात जनरेटर असूनही त्यात डिझेल नसणे, एक जनरेटर बंद पडणे आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसणे, ही बाब आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवेचा आधार असलेल्या या रुग्णालयातच अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.