चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सावंतवाडीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुवारी मध्यरात्री झालेल्या चक्रीवादळामुळे सावंतवाडी शहर व तालुक्यात खूज मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र झालेले नुकसान पाहता प्रशासनाकडून देण्यात आलेले नुकसान भरपाईचे आकडे हे पुरेसे नसून वेळ पडली तर निकषात बदल केला जाईल मात्र नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
यावेळी त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्या पद्धतीच्या सूचना केल्या.
चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची ना. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. झालेली नुकसानी ही खूपच मोठी असून वेळ पडल्यास निकष बदलून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यानी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, लखमराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगरपरिषदेचे सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, अर्चित पोकळे, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संतोष गांवस, संतोष मठकर, एसपीकेचे प्राचार्य डि. के. भारमल अन्य प्राध्यापक यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,चक्रीवादळामुळे सावंतवाडी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेलं नुकसान मोठं असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार तसेच चौकटी बाहेर जावून देखील लोकांना आधार देऊ, आज आमच्या जनतेला आधाराची गरज आहे असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व आमची सर्व टीम नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काढलेल्या गाळाचे काय करावे याचे धोरणही निश्चित आहे. एक-दोन ठिकाणी गैरसमज झाला असेल तर प्रशासनाची तशी प्रतिमा तयार करू नये, सर्वांमध्ये समन्वय असून पालकमंत्री म्हणून माझा लक्ष सर्वांवर आहे. गाळ काढत पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. यावर्षीही गाळ काढत पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करणार !
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांसह इतर पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याची तयारी आहे. शासन म्हणून तशी पाऊले टाकलीत. महावितरणच्या कामात गेल्यावर्षीपेक्षा सुधारणा आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आला असून तो खर्चही होत आहे. टप्याटप्प्यात सर्व समस्या दूर होतील. कोणतीही कारणं आम्ही देणार नसून भूमीगत वीज वाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याला फायदा होईल असा ‘शक्तीपीठ’मार्ग होणार
शक्तीपीठ महामार्गाबाबत बैठका झाल्या असून आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या सुचनांची दखल घेतली आहे. या मार्गाचा फायदा जिल्ह्याला कसा होईल ? ते बघीतल आहे. बांदा व इतर गावं बाधीत होणार नाहीत. त्यातून आम्ही मार्ग काढला असून तसा नवीन मार्ग तयार केला आहे. रेडी पोर्टलाही तो जोडला जाणार आहे. कुठल्यातरी संघर्ष समितीने पत्र दिल्यासारखा राज्य सरकारचा कारभार चालत नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्याला फायदा होईल असा शक्तीपीठ महामार्ग तयार होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिक्तपद भरली जातील !
दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी डॉक्टर नेमण्यात येत आहेत. एमडी फिजीशीयन सावंतवाडीला देण्यात आला आहे. येणाऱ्या एप्रिल ते जून महिन्यात आरोग्य विभागातील इतरही रिक्तपद भरली जातील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.












