खेड(प्रतिनिधी)
तालुक्यात यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने जगबुडी नदीपात्रासह नारिंगी नदी व ग्रामीण भागातील नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला होता. सद्यस्थितीत उष्मा हळूहळू वाढू लागला आहे. यामुळे उपलब्ध पाण्याच्या जलस्रोतांमध्ये घट होऊ लागली आहे. भरणे जगबुडी नदीपात्रातील पाण्याची पातळीही घटत चालली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात यंदा ४३४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील नातूनगर, शिरवली, पिंपळवाडी कोडिवली धरण देखील ‘ओव्हरफ्लो’ होवून मुबलक प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला होता. धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाईची समस्या कमी प्रमाणात जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, हळूहळू उष्मा वाढू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालले आहे.
यंदा टंचाई आराखड्यात १७ गावे ४४ वाड्यांचा समावेश करण्यात आला असला तरी ही गाव- वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. टंचाईग्रस्त गाव वाड्यांना चोरद नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत चोरद नदीपात्रात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने ही प्रशासनासह ग्रामस्थांसाठी समाधानकारक बाब ठरली आहे.









