Blocking the car at Amboli Ghat and beating it up cost the youth dearly
अवघ्या तीन दिवसात अल्टो गाडीसह ४ तरुण पुण्यातून घेतले ताब्यात
पोलीस उपनिरिक्षक अमित गोते यांची कौतुकास्पद कामगिरी
सावंतवाडी | प्रतिनिधी : आंबोली घाटात ओव्हरटेक करण्यास न मिळाल्यच्या रागातून समोरील वाहनात असलेल्या डॉ. धीरज पोळ यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की करणे तसेच गाडीचे नुकसान करणे व कुटुंबीयांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवेगाळ करणे प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुण्यातील चार तरुणांना पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी पुणे येथे जाऊन त्यांच्या गाडीसह चारही जणांना ताब्यात घेतले. अल्ताफ सिकंदर सामलेवाले ( वय ३०)
,सिद्धार्थ मनोज चावरिया (२४),
चेतनसिंग मोहन सिंग मेहता ( वय २७ ) आणि सरफराज अस्लम समलेवाले (वय २९, सर्व राहणार पुणे ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या ताब्यातील अल्टो कार ( एम १४ जीएच २६७४ ) ही देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार १४ मे रोजी दुपारच्या सुमारास डॉक्टर पोळ हे त्यांची पत्नी आणि लहान मुलाला सोबत घेऊन घाटातून निपाणी येथे जाण्यासाठी त्यांच्याकडील क्रेटा ही गाडी घेऊन जात होते.
गाडीत लहान मूल असल्याने ते सावकाश गाडी चालवून सुरक्षित घेऊन जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून गोवा येथून फिरून आलेले तीन ते चार तरुण अल्टो गाडी घेऊन वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. घाटात नेहमी प्रमाणे गाड्यांची वर्दळ असल्याने त्यांना पुढे जाण्यासाठी संधी मिळत नव्हती. परंतु या तरुणांनी पुढे जाण्यास संधी मिळत नसल्याचा राग येऊन आपल्याकडील अल्टो कार आडवी घालून डॉक्टरांची गाडी अडवली. त्या अल्टो गाडीतुन ३ ते ४ तरुण खाली उतरुन डॉ. पोळ यांच्या गाडीजवळ येऊन त्यापैकी एका तरुणाने त्यांना मारहाण केली. तर दुसर्याने रस्त्यावरील दगड हातामध्ये घेऊन क्रेटा गाडीच्या काचेवर व बोनेटवर मारून गाडीचे नुकसान केले. तसेच गाडीच्या पाठीमागे जाऊन पत्नीच्या अंगावर धावुन जाऊन शिविगाळ केली. या घटनेनंतर डॉ. पोळ यांनी आंबोली पोलीस दुरक्षेत्र येथे येऊन पोलीस हवालदार दीपक शिंदे यांना हकीकत सांगितली आणि यावरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात डॉ. धीरज शिवराम पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून १२३/२०२३ भादवि कलम ३४१,३५१,३२३,५०४,४२७,३४
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर गुन्ह्यातील गाडी अडवून गाडीचे नुकसान करून ,मारहाण आणि शिवीगाळ करून पळून गेलेले अनोळखी तरुण शोधणे आणि त्यांना ताब्यात घेणे हे पोलीसांसाठी मोठे आव्हान होते. त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांच्याकडे देण्यात आली. यानंतर सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या सूचनेप्रमाणे शोध घेण्यासाठी अमित गोते पुणे येथे गेले.
तक्रारदार डॉ. पोळ यांनी दिलेला गाडीचा नंबर यावरून गाडी मालकाचे नाव व पत्ता शोधला. यानंतर अवघ्या दोन दिवसात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सिंधुदुर्ग सायबर विभाग यांचे मदतीने चारही आरोपी यांना त्यांनी वापरलेल्या अल्टो गाडी सह शोधून पोलीस ठाणे सावंतवाडी येथे आणले. पोलीस अधिकाऱ्याने याप्रकारे धाडसाने आणि चातुर्याने केलेल्या कामगिरीबद्दल सावंतवाडी नागरिक आणि पर्यटक यांच्यात निश्चितच पोलिसांबाबत विश्वासाची आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरिक्षक अमित गोते यांनी याआधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींना भोपाळ, राजस्थान या राज्यातून तसेच जिल्ह्यातून शोधून सुरक्षित आणले आहे आणि आरोपींना जेरबंद केले आहे. तसेच नागरिकांचे चोरीस गेलेले अनेक मोबाईल, किमती वस्तू आणि हरवलेल्या व्यक्ती शोधण्याचा त्यांचा हातखंडा असल्याने ही कामगिरी त्यांच्यावर सोपवली गेली होती. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, डॉ. पोळ यांनी दिलेल्या तक्रारी मधील तीन ते चार अनोळखी तरुण, त्यांनी वापरलेल्या अल्टो गाडीसह सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आणले असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Sindhudurg