जमिनीपासून ९३ फूट उंची : कांस्य धातूचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा
हायग्रेड काँक्रिट व पोलादी स्वरूपात फाउंडेशनचे काम पुर्ण
१९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा
अमित खोत | मालवण : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपात तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी होत आहे. हायग्रेड एम 50 दर्जाचे काँक्रिट व पोलादी स्वरूपात सळ्या, पॅनल यांच्या वापरातून फाउंडेशनचे काम पुर्ण करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती दिनी राज्याचे मत्स्यव्यावसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रत्यक्ष पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.
किल्ले राजकोट येथे सुरु असलेल्या पुतळा उभारणी कामाची पाहाणी कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, मालवण उपविभागीय सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी केली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना महाराजांच्या पुतळा उभारणी कामा बाबत माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि. यांच्या वतीने पुतळा उभारणी केली जात आहे. सुमारे 31 कोटी 75 लाख निधीला प्रसासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर 10 एप्रिल पर्यत पुतळा उभारणी पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात महाराजांचा पुतळा उभारणी हे काम अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे हे महाराजांचा पुतळा उभारणीवर विशेष लक्ष ठेवून असून सातत्याने आढावा घेतला जात आहे. संपुर्ण कामाचा दर्जा सर्वोत्तमच असावा यावर पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष लक्ष आहे.

किल्ले राजकोट येथे महाराजांचा पुतळा उभारणी होत असताना फाउंडेशन (चबूतारा) जमिनीखाली सुमारे पावणेचार मिटर काम पुर्ण झाले असून जमिनीपासून तीन मिटर उंचीच्या कामापैकी बहुतांश कामही पुर्ण झाले आहे. स्वतंत्र गुणवता चाचणी टीम कडून कामाची गुणवत्ता तपासणी चाचणी घेतल्या जात आहेत. भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आय आय टी) मुंबई यांनी यांनी स्टील डिझाईन मान्यता दिली आहे. तर ताशी 200 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तरी पुतळा भक्कमपणे उभा राहील याची चाचणीही ऑस्ट्रेलिया येथे घेतली जात आहे. किमान 100 वर्षे आयुर्मान पुतळ्याचे असेल. तर ठेकेदार एजन्सी मार्फत 10 वर्षे देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. भव्यदिव्य स्वरूपात महाराजांचा पुतळा उभारणी होणार आहे.










