शिक्षक पतपेढी अपहार प्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी सुनील भागवत यांची निर्दोष मुक्तता

 

दोडामार्ग । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या दोडामार्ग शाखेतील सुमारे ५५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात संशयित आरोपी असलेले तत्कालीन शाखाधिकारी सुनील शांताराम भागवत यांच्यासह सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोडामार्ग येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) श्री. वाय. पी. बावकर यांनी हा निकाल दिला.

सन २००७-२००८ या कालावधीत शिक्षक पतपेढीच्या दोडामार्ग शाखेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत दोन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले होते. तपासी यंत्रणेने या प्रकरणात सुमारे ५५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते.

या खटल्यात आरोपींतर्फे अ‍ॅड. परिमल नाईक यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. विश्राम घोगळे, अ‍ॅड. सुशील राजगे, अ‍ॅड. रश्मी नाईक आणि अ‍ॅड. अमिषा बांदेकर यांनी सहकार्य केले. बचाव पक्षाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, भारतीय राज्यघटनेच्या कलम २०(२) नुसार एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवणे बेकायदेशीर आहे. तसेच, अंतर्गत लेखापरीक्षणात कोणताही अपहार आढळला नव्हता, केवळ तांत्रिक त्रुटी होत्या. तपास अधिकाऱ्यांनी हस्ताक्षर नमुने घेताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याने तो पुरावा ग्राह्य धरता येणार नाही, असाही दावा करण्यात आला.

साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती आणि ठोस पुराव्यांचा अभाव लक्षात घेता, न्यायालयाने सुनील भागवत व अन्य आरोपींची या प्रकरणातून मुक्तता केली.