साळशी येथे आंबा व काजू बागेला भीषण आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी-देवणेवाडी येथील शेतकरी सुभाष आणि भगवान सदाशिव देवणे यांच्या साळशी-तांबाळ भागातील आंबा व काजूच्या बागेला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि तब्बल १५० काजू कलमे व ११७ हापूस आंब्याची कलमे जळून खाक झाली. तसेच १०० चिवे (बांबू) आणि इतर झाडांचेही मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

श्री.देवणे नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्याबागेत आल्यानंतर आगीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. चाफेड गावातील ग्रामस्थांनीही धाव घेत अथक प्रयत्न केले आणि आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. अन्यथा संपूर्ण बाग भस्मसात झाली असती.

श्री. देवणे यांनी गेली अनेक वर्षे मेहनतीने काजू व आंब्याच्या झाडांची जोपासना केली होती. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि लहरी हवामानाशी झगडत असतानाच लागलेल्या या आगीने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषतः काजू व आंब्याच्या हंगामाच्या तोंडावरच हे नुकसान झाल्याने त्यांचा संपूर्ण उत्पादन हंगाम वाया गेला आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अनावधानाने लागलेल्या आगीत कष्टाने उभे केलेले पीक भस्मसात झाले आहे.
या घटनेचा शिरगाव महसूल अधिकारी स्वेतांजली खरात, साळशी पोलीस पाटील कामीनी नाईक यांनी पंचनामा केला.
शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शुभाष व भगवान देवणे या बंधूनी केली आहे.