खेड (प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी सायंकाळी झालेल्या वायुगळतीत काही कामगार जखमी झाले आहेत. त्यातील एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्पादन प्रक्रिया सुरू असताना तापमानात वाढ झाल्याने पाइपलाइनला गळती लागून वायुगळती झाली. यावेळी इथे काम करणाऱ्या कामगारांना त्याची बाधा झाली. या कामगारांपैकी सागर काते (रा. लोटे) याला गंभीर बाधा झाल्याने त्याला चिपळूण येथे नेण्यात आले आहे.
औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरातील ग्रामस्थही कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडकले होते. या अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. या कंपनीतील वायू मुंबई – गोवा महामार्गापर्यंत पसरल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, काहींना त्याचा त्रास झाला.










