खेड मधील अनधिकृत खोक्यांवरील कारवाईचा बार फुसका

खेड(प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागांवर कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे उभारलेले अनधिकृत खोके अद्ययावत करण्याची कामेही सुरु आहेत. मात्र तरीही नगरप्रशासन गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून अनधिकृत खोक्यांवर नगरप्रशासनाचा रितसर कारवाईचा बार फुसका ठरला आहे.

शहरात आतापर्यंत मोक्याच्या ठिकाणी ३५हून अधिक अनधिकृत खोके उभारून बहुतांश खोक्यांमध्ये दुकानेही थाटली आहेत. तर काहींनी केवळ खोक्यांची उभारणी करत मोक्याच्या जागा अडवून ठेवल्या आहेत. या खोक्यांमुळे रुंद रस्तेही आता अरुंद झाले असून बकालपणा आला आहे.

यापूर्वी नगर प्रशासनाकडून अनधिकृत खोके उभारणाऱ्यांवर रितसर कारवाईचा प्रशासकीय ठराव
केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. यानंतर कारवाईबाबतची रितसर टिपण्णी तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही नगरप्रशासनाला अद्याप कारवाईसाठी सवड मिळालेली नाही.

समर्थनगर येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या
वसाहतीसमोरच काही महिन्यांपूर्वी उभारलेले खोके अद्ययावत करण्याचे कामही दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. या खोक्यांमध्ये वीजपुरवठाही कार्यान्वित झाला आहे. महावितरणकडून अनधिकृत खोक्यामध्ये बीज पुरवठा कार्यान्वित करण्याच्या दाखवलेल्या तप्तरतेबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.