गावात घर नसताना परप्रांतीय व्यक्तीला घरपत्रक उतारा मिळालाच कसा

गोळवण गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालवर धडक ; कारवाईची मागणी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही ग्रामस्थांच्या मागलीला दर्शवला पाठिंबा

मालवण | प्रतिनिधी : गोळवण गावात एका परप्रांतीय व्यक्तीला दिलेल्या घर पत्रक उताराच्या विषयावरून वातावरण तापले आहे. गुरुवारी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालवर धडक देत तक्रार दाखल केली आहे. यां प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान तहसीलदार वर्षा झालटे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवर संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी गोळवण ग्रामपंचायतच्या कारभारावरही अनेक सवाल उपस्थित केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तहसीलदारांची भेट घेत गोळवण ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. जर चुकीच्या पद्धतीने परप्रांतीय व्यक्तींना घरपत्रक उतारा आणि आश्रय देण्यात येत असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका सामंत यांनी मांडली. यावेळी ग्रामस्थांनी सामंत यांच्या भूमिकेला समर्थन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सकल हिंदू समाजाच्यावतीने गोळवण ग्रामस्थांना पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभाग घेण्यात आला होता. यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, अवी सामंत, अनिकेत फाटक, बाबी जोगी, प्रसाद आडवणकर, दिपक पाटकर, भाऊ मोरर्जे, हरेश फडते, महेश जुवाटकर तसेच इतरही उपस्थित होते.
परप्रांतीय व्यक्तीला दिलेले रेशन कार्ड कशाप्रकारे देण्यात आले. यासाठी दाखल केलेली कागदपत्रे कोणी कोणी बनवून दिली. कोणती कागदपत्रे योग्य आहेत. कोणती कागदपत्रे बोगस बनवण्यात आली. याची शहानिशा करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकरण सादर करण्यात येईल आणि अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसीलदारानी स्पष्ट केले.

गोळवण गावातील परप्रांतीय व्यक्तीकडे रेशन कार्ड आणि त्याला धान्य मिळू लागल्याची माहिती मिळताच लोकांकडून झालेल्या उठावामुळे परप्रांतीय व्यक्तीने जबरदस्तीने ताबा घेतलेल्या घरातला ताबा पुन्हा घरमालकाने घेतला आहे. तसेच सध्या तो पळून गेला आहे. परप्रांतीय व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे मोबाईल लोकेशन चेक करून त्याच्यावर बोगस कागदपत्रे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.