संस्कृत्या:द्दोतका:भाषा अस्ति |
“असे शब्द हे त्या भाषेंचें घरात दास म्हणून असावेत.शिवाय एखादा परकीय शब्द घ्यायचाच झाला तर तो इतर संस्कृतद्भव हिंदु भाषेतुन घ्यावा.”
“हिंदु भाषासंघ सोडून अहिंदु भाषेतील शब्द जुने असोत वा नवे असोत, विनाकारण आणि शक्य तोंवर आपल्या भाषेत डोईजड होऊ देऊ नयेत.”
“जगातील कोणत्याही परकीय भाषेंत जर एखादी शैली वा प्रयोग वा मोड ही सरस वा चटकदार वाटली तर ती आत्मसात करण्यास आडकाठी नसावी.”
——-++++++——+++++++++++——–+++
विश्वजीत चिरपुटकर
संस्कृत्या:द्दोतका:भाषा अस्ति |
अर्थात भाषा ही आपल्या संस्कृतीच द्योतक असते.त्यामुळे परकीय आक्रमणांचा परिणाम हा जसा त्या देशाच्या संस्कृतीवर होतो,तसाच तो कालांतराने तेथिल प्रादेशिक भाषेवर सुद्धा होत असतो. इतिहासात आपल्याला प्रामुख्याने मुघलांच्या काळात दैनंदिन व्यवहारात फार्सी व अरबी भाषेची वाढलेली गुलामी दिसून येते.तर ब्रिटिशांच्या काळात हिच जागा इंग्रजीने घेतल्याचे आपल्याला दिसते.भाषेची ही गुलामी छञपती शिवाजी महाराजांनी जशी राज्यव्यवहारकोश निर्माण करून मोडून काढली.त्याच प्रेरणेतून स्वा.सावरकरांनी ब्रिटिशांच्या काळात भाषाशुद्धीची चळवळ उभी केली होती.
अर्थात भाषाशुद्धीची हि चळवळ त्या काळात महाराष्ट्रासाठी काही नवीन नव्हती. छञपती शिवाजी महाराज ते कवी मोरोपंत असा एका दशकाचा प्रदिर्घ वारसा या चळवळीस होता.पुढे ब्रिटीशांच्या राज्यात दुर्दैवाने इंग्रजी हि व्यवहारात आणि प्रशासनात सत्तारूढ झाली.यावेळस मराठी भाषेचे शिवाजी अशी इतिहासात ज्यांची ओळख आहे,त्या ‘मालाकार’ विष्णूशास्ञी चिपळूणकर यांनी भाषाशुद्धीची हि चळवळ महाराष्ट्रात पुन्हा एकदा रुजवली.त्यांच्या पश्चात या शुद्धी चळवळीस ऊर्जितावस्था देण्याचे कार्य स्वा.सावरकरांसारख्या ‘शब्दरत्नाकाराने’केले.
रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेण्यास बंदी असून देखील राजकारण म्हणजे समाजकारण या न्यायाने अंधश्रद्धा, अस्पृश्यता निवारण यांसारखी जी समाज हिताची कार्ये सावरकरांनी हाती घेतली त्या दृष्टीने ह्या चळवळीस देखील तितकेच महत्व देता येईल.
भाषाशुद्धीची ही चळवळ केवळ राजकीय व सामाजिक परिभाषेपुरती मर्यादित न ठेवता सावरकरांनी तीला खऱ्या अर्थाने देशपातळीवर उभी केली.राजकीय, सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक अश्या जीवनाच्या सर्व क्षेञातील घटकांसाठी सावरकरांनी नवे शब्दभंडार उपलब्ध करून दिले.विधानसभा,विधीमंडळ,अर्थसंकल्प, टपाल,शाळा,सैन्य,लढाई अश्या कित्येक शब्दांचा जन्म याच शब्दकोशातून झाला.
ब्रिटीशांच्या सर्व बंधनातून मुक्त झाल्यावर कोल्हापुरच्या ‘हंस पिक्चर्स’ला या सर्व कार्याच्या संदर्भात सावरकरांनी एकदा भेट दिली होती.त्या ठिकाणी पोहचल्यावर समोरील सर्व पाट्या इंग्रजीत असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी बाबूराव पेंढारकरांना मराठी पाट्या लावण्यास सांगितले.त्यावर पेंढारकर पर्यायी शब्द सुचवा असे म्हणाले. त्याच क्षणाला चित्रपट,बोलपट,दिग्दर्शक, कलागृह असे कित्येक नवीन शब्द मराठी कला विश्वाला मिळाले.या एका प्रसंगातून सावरकरांच्या या कार्याची महती आपल्याला लक्षात येते.
शुद्धीच्या या मार्गावर प्रतिशब्दांसोबत भाषेच्या उत्पत्तीपासुन ते भाषेचे मुळ व त्यातील शब्दांचा अपभ्रंश ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्याचे ही आपल्याला दिसून येते.आजदेखिल दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या अनेक शब्दांचे मुळ हे आपण फार्सी व अरबीभाषेत असल्याचे पाहतो.किंबहुना बरचसे शब्द हे परकिय भाषेतुनच आपल्यात रुळलेत असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.या संदर्भात बोलताना सावरकर म्हणतात की,”असे शब्द हे त्या भाषेंचें घरात दास म्हणून असावेत.शिवाय एखादा परकीय शब्द घ्यायचाच झाला तर तो इतर संस्कृतद्भव हिंदु भाषेतुन घ्यावा.”मुळातच”हिंदु भाषासंघ सोडून अहिंदु भाषेतील शब्द जुने असोत वा नवे असोत,विनाकारण आणि शक्य तोंवर आपल्या भाषेत डोईजड होऊ देऊ नयेत.”हिच या शुद्धीकरणामागची संक्षिप्त व्याख्या होती.
श्रद्धानंद’हे सावरकर बंधूंनी चालू केलेले साप्ताहिक त्या काळात भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या दोंन्ही चळवळींसाठीचे मुखपञ म्हणून प्रसिद्ध होते.सावरकरांचे सहकारी पाचलेगावकर महाराज,डॉ रघूवीर यांसारख्या अनेक मंडळींनी या कार्यासाठी आपला हातभार लावला होता.या साऱ्यांचा उल्लेख सावरकर आपल्या लेखांमधून भाषेचे अभिमानी असा आवर्जून करीत असत.
अर्थात समाज नियमाप्रमाणे भाषाशुद्धीच्या या चळवळीस देखील त्या काळात मराठी साहित्य विश्वातालील अनेक नामवंतांनी विरोध दर्शवला.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्ष असताना याबाबतीत आपले काही आक्षेप नोंदवले. त्या सर्वांना प्रत्यूत्तर म्हणून सावरकरांनी ‘श्रद्धानंद’या साप्ताहिकात या विषयीची आपली भूमिका मांडली.त्याचा परिणाम म्हणून पुढे कोल्हटकर यांनी देखील सावरकरांच्या या कार्याचे कौतून करताना विदेशी शब्दांविरोधात उभ्या केलेल्या या चळवळीमुळे परकीय शब्दांच्या वापराला ओहोटी लागल्याचे मान्य केले.थोर कवी माधव ज्युलियन सुद्धा सुरवातीला या चळवळीच्या विरोधात होते.कालांतराने या शुद्धीमागचा मुळ हेतू लक्षात येताच त्यांचा विरोध मावळला.त्यानंतर माञ फारसी शब्दांच्या पंक्तीत बसलेल्या आपल्या साऱ्या कविता त्यांनी शुद्ध मराठीत लिहून तर काढल्याच!पण,त्यासोबत उर्दू व फारसी शब्दांसाठी पर्यायी प्रतिशब्दांचा शब्दकोश देखील प्रसिद्ध केला.त्यावर’भाषाशुद्धी विवेक’हे पुस्तक लिहून काढले.
मराठी भाषेप्रमाणे इतर प्रादेशिक भाषांसंदर्भात सुद्धा सातत्याने सावरकरांनी आपल्या लेखप्रपंचातुन वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.तमिळी,तेलगू,आसामी,काश्मीरी, गौड,भिल्ल यांसारख्या अनेक संस्कृतद्भव हिंदू भाषांना सावरकर आपल्या प्रांतिक भगिनी मानत होते.शिवाय मराठी भाषेप्रमाणेचं उर्दू भाषेतदेखील अनेक काव्य व गजला ह्या त्यांनी केल्या होत्या. “जगातील कोणत्याही परकीय भाषेंत जर एखादी शैली वा प्रयोग वा मोड ही सरस वा चटकदार वाटली तर ती आत्मसात करण्यास आडकाठी नसावी.”असे एकंदरीत सावरकरांचे मत होते.
छञपती शिवाजी महाराज,कवी मोरोपंत ते अगदी सावकरांपर्यंत अनेक महाराथींनी या विषयाच्या अस्तित्वासाठी आपले विपूल असे योगदान दिले आहे.परंतू आजदेखील
विश्वाचे आर्त ज्या भाषेतून प्रकटले त्या
मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि न्याय हक्कांसाठी ठिकठिकाणी लढा द्यावा लागतायं,हे मराठी मनाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.अर्थात या सर्व बाजूंवर सावरकरांनी फार पुर्वीच आपले आक्षेप नोंदवले आहेत.त्यामुळे काळानूरूप परिस्थिती बदलली असली तरी अजूनही तोच मुळ लढा सुरू आहे असेच म्हणावे लागेल.केंद्र शासनाने त्यात मराठीस दिलेला अभिजात भाषेचा दर्जा हि आत्तापर्यंतच्या इतिहासातील फक्त एक सकारात्मक बाजू राहिली आहे.त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी या प्रवासातील पुढील टप्पा हा अधिक महत्त्वाचा आहे.तो अतीव आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला असावा यासाठी अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या माय मराठीच्या वादळास सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
संदर्भ-भाषाशुद्धी-स्वा.विनायक दामोदर सावरकर












