शिमगोत्सव व रमजान शांततेत साजरा करावा

शांतता सामितीच्या बैठकीत सावंतवाडी पोलिसांचे आवाहन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : रंगांचा सण म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सव तसेच मुस्लीम समाजाचा रमजान सण काही दिवसावर आले असून या सणांच्या निमित्ताने समाजात शांतता रहावी म्हणून सावंतवाडी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते.

होळी उत्सव आणि रमजान सण दोन्ही समाजात शांतता राखत साजरा केला जावा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

सावंतवाडी पोलीस ठाणे येथे या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, तौकिर शेख, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

होळी उत्सवात सांगेली येथे श्री देव गिरोबा व कुणकेरी येथील हुडोत्सवाला जत्रेचे स्वरूप येते. तसेच प्रत्येक गावांमध्ये चालीरिती रुढी परंपरा प्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो. मात्र, सावंतवाडी तालुक्यात कोणत्याही गावात कसलाही तंटा न होता सर्वत्र शांतता असते अशी माहिती यावेळी उपस्थितांकडून देण्यात आली.

दरम्यान, पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी प्रत्येक समाजाने आपल्या रूढी परंपरेने चालत आलेले सण शांततेत साजरा करून कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन केले.