दोडामार्ग:सुहास देसाई
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय ‘परसबाग’ स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेने संपूर्ण जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.
या यशाबद्दल शाळेचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्या हस्ते शाळेला सन्मानित करण्यात आले.
स
यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री. दिपक गवस दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या आणि गावाच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी हा सन्मान अत्यंत अभिमानाने स्वीकारला.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत विकसित केलेली उत्कृष्ट परसबाग, त्यातील वैविध्य आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे या शाळेने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
या शाळेने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण झोळंबे गावात आनंदाचे वातावरण आहे. “शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले असून, यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आरोग्यदायी उपक्रमात झोळंबे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले.










