खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील वीज ग्राहकांकडे महावितरणची १३ कोटीहून अधिक थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. थकित बिलांची वसुली करण्याचे महावितरणसमोर मोठे आव्हान असून वसुलीसाठी महावितरणकडून चारही उपविभागात तब्बल ४०० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. दोन-तीन वेळा सूचना देवूनही वीजबिले भरण्यास कुचराई करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
तालुक्यातील थकित वीज ग्राहकांना महावितरण कर्मचाऱ्यांनी यापूर्वी तोंडी सूचना देत वीजबिले तातडीने भरण्याबाबत सूचित केले होते. सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना रितसर नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. महावितरणने फेब्रुवारी महिन्यातच थकित ग्राहकांकडील बिले वसुलीसाठी पथके तैनात करत वसुली मोहीम राबवण्यास सुरुवात केली. महावितरणने अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केल्यानंतर अनेक ग्राहकांनी स्वतःहून महावितरणच्या वीज भरणा केंद्रासह पतसंस्थांमधील वीजभरणा केंद्रांकडे देयके भरणे पसंत केले होते.
सद्यस्थितीत तालुक्यातील ४ उपविभागातील वीज ग्राहकांकडे १३ कोटीहून अधिक थकबाकी शिल्लक आहे. ही थकित रक्कम वसूल करून मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्तीसाठी महावितरणने कंबर कसली आहे. प्रत्येक उपविभागात ९० हून अधिक कर्मचारी थकित बिलांच्या वसुलीसाठी दारोदारी फिरत आहेत. सुरुवातीला दोन -तीन वेळा सूचना देत वीजबिले भरण्यास मुभा दिली जात आहे. मात्र तरीदेखील वीजबिले भरणा करण्यास कानाडोळा करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
तालुक्यात ४०० हून अधिक कर्मचारी वीजबिलांच्या वसुलीसाठी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांपाठोपाठ उपविभागातील त्या-त्या अधिकाऱ्यांचाही पथकात समावेश आहे. थकित ग्राहकांनी बिलाची रक्कम तातडीने भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.











