ब्रेनस्टेमपर्यंत पसरलेल्या गाठीवर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
मायक्रोसर्जरी व न्यूरो-मॉनिटरिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक अशा 16.5 सेमी लांबीच्या पाठीच्या कण्यातील ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ही गाठ ब्रेनस्टेमपासून वक्षस्थळाच्या चौथ्या मणक्यापर्यंत पसरलेली होती. अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च जोखमीची असूनही डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली गेली आहे.
पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीचा दुर्मिळ ट्यूमर यशस्वीरित्या काढला आहे. ही गाठ ब्रेनस्टेमपासून मानेच्या मणक्याद्वारे व चौथ्या वक्षस्थळाच्या पातळीपर्यंत पसरलेली होती.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, हा प्रकार इंट्रामेड्युलरी ट्यूमर असून तो पाठीच्या कण्यामध्ये तयार होतो आणि अशा प्रकारचे प्रकरण अत्यंत दुर्मिळ मानले जाते. विशेष म्हणजे ही गाठ मेडुला ओब्लॉन्गाटा पर्यंत पोहोचली होती, जी श्वासोच्छ्वास आणि हृदयगतीसारख्या महत्त्वपूर्ण क्रियांवर नियंत्रण ठेवते.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना अत्यंत काळजीपूर्वक स्पायनल कॉर्ड उघडून गाठ न्यूरल टिश्यूपासून वेगळी करावी लागली. अशा प्रक्रियेत पक्षाघात किंवा गंभीर न्यूरोलॉजिकल नुकसानाचा उच्च धोका असतो.
या शस्त्रक्रियेत प्रगत मायक्रोसर्जिकल तंत्रज्ञान आणि इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो-मॉनिटरिंग सिस्टम वापरण्यात आली, ज्यामुळे ऑपरेशनदरम्यान मज्जातंतूंची स्थिती रिअल-टाइममध्ये ट्रॅक करता आली. यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली.
सह्याद्री हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सांगितले की, गाठीचा आकार आणि तिचे महत्त्वाच्या मेंदूच्या भागांशी असलेले संबंध यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. तरीही रुग्णाची न्यूरोलॉजिकल क्षमता जपणे आणि गाठ पूर्णपणे काढणे हे यशस्वीरीत्या साध्य झाले.
तज्ज्ञांनी सांगितले की, पाठीच्या कण्यातील गाठींची लक्षणे अनेकदा साध्या पाठदुखी किंवा स्नायूंच्या त्रासासारखी भासतात, त्यामुळे निदान उशिरा होते. एमआरआयद्वारे लवकर तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे वेळेवर उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.











