वेंगुर्ले ; दाजी नाईक
मिठागरवाडी, शिरोडा येथे मिठागराचा संरक्षक बांध फुटुन समुद्राचे खारे पाणी घुसल्याने येथील मिठागर जलमय झाला आहे. तर अजूनही अनेक मिठागर धोक्यात आले आहेत. तसेच काही प्रमाणात भात शेतीतही खारे पाणी घुसले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

सोमवारी रात्री अचानक समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे खारे पाणी मिठागर आणि शेतामध्ये घुसले आहे. राऊतवाडी व टेंमवाडी येथील शेतकरी व मीठ व्यवसायिकांनी धावपळ करुन स्वमेहनतीने व मशीनच्या सहाय्याने शेतजमीनीचे संरक्षण करण्यासाठी आज बांध घालून प्रयत्न केले.

तर केरवाडी, शिरोडा येथील खार भूमी विकास विभागाचा संरक्षक मातीच्या बंधाऱ्याला भगदाड पडले असून भातशेतीत व माड बागायतीत मोठ्या प्रमाणात खारे पाणी घुसले आहे. आज दुपारी खार भूमी विकास उपविभागाचे वेंगुर्ले चे कनिष्ठ अभियंता रोहन जुवेकर,भालचंद्र पाटील लक्ष्मण भूते व सहकारी यांनी तातडीची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रात्रीच्या वेळी पाणी वाढल्यामुळे ते खारे पाणी श्री. ज्ञानेश्वर परब यांच्या मिठागरामध्ये घुसले आणि मिठागर जलमय झाला. मिठागर व शेतीत जाणारे खारे पाणी रोखण्यासाठी येथील शेतकरी श्री. आबा राऊत , श्री. विठ्ठल (दादा) गावडे व इतरांनी प्रयत्न केले.









